दिल्ली: – करोना पूर्ण नियंत्रणात आल्याशिवाय आणि या रोगाच्या प्रसाराचा आता धोका उरला नाही याची खात्री पटल्याशिवाय देशांतर्गत आणि देशाबाहेरील विमान सेवांना अनुमती दिली जाणार नाही असे स्पष्टीकरण नागरी विमान वाहतूक खात्याचे मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिले आहे. त्यांनी सांगितले आहे की या संबंधात विमान कंपन्यांना स्पष्टपणे सारी स्थिती कथन करण्यात आली आहे. पण तरीही त्यांनी सरकारच्या सूचनांकडे लक्ष न देता 3 मे पासूनच बुकिंग घेणे सुरू केले आहे. त्यांनी सरकारची सुचना आल्याशिवाय कोणतेही बुकिंग स्वीकारू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.
ज्या विमान कंपन्यांनी बुकिंग सुरू करून पैसे जमवायला सुरूवात केली आहे त्यांना आम्ही 19 एप्रिल रोजी पत्र पाठवून तसे न करण्याची सूचना केली आहे. या विमान कंपन्यांना पुरेसा अवधी देऊन आम्ही बुकिंगची संधी देऊन त्यांच्या सेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ असेही पुरी यांनी सांगितले. सरकारच्या सल्ल्यानंतर एअर इंडियाने आपले बुकिंग थांबवले आहे. ज्यांनी आधीच बुकिंग केले आहे पण लॉकडाऊन मुळे ज्यांना प्रवास करता येणे शक्य नाही अशा प्रवाशांनी आपले तिकीट बुकिंगचे पैसे विमान कंपन्यांकडे परत मागीतले आहेत.
तथापि विमान कंपन्यांनी हे पैसे त्यांना परत देण्यास टाळाटाळ केली असून प्रवाशांना पुढील प्रवासासाठी हे पैसे वापरता येतील अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विमान कंपन्या आता आर्थिक दृष्ट्या डबघाईला आल्या असल्याने त्यांना हे रिफंड देणे शक्य नाहीे. त्यामुळे त्यावर त्यांनी हा मार्ग शोधला आहे. पण अनेक प्रवाशांनी मात्र पैसेच परत हवे असल्याचा आग्रह धरला आहे. त्यावर आता सरकार काय तोडगा काढणार हे पहावे लागेल.