यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तक्रारीवरून कारवाई
यावल (प्रतिनिधी) :- येथील एसटी बस स्टॅन्ड आवारात एक चहा विक्रेता १५ रुपये किंमत असलेली महामंडळाची “नाथजल” पाण्याची बाटली एसटी स्टँड आवारातील प्रवाशांना २० रुपयात विकत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष सतीश चोपडे यांनी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्याकडे केली होती. आगार व्यवस्थापक महाजन यांनी तात्काळ दखल घेऊन दुकानदाराची चौकशी केली. तसेच त्याला १ हजार रुपये दंड ठोठावला.
गोरगरीब जनता तसेच प्रवाशांसाठी नाथजल पाण्याची सुविधा शासनाकडून उपलब्ध करून दिलेली आहे. ‘नाथजल’ पाण्याची बाटली फक्त १५ रुपये दराने विक्री करायचे स्पष्ट आदेश सूचना आहेत. मात्र यावल एसटी बसस्थानक परिसरात परवानाधारक दुधानी नामक चहा विक्रेता हा एक पाण्याची बाटली २० रुपये दराने विक्री करताना आढळून आला. तसेच याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष आकाश चोपडे, जुगल पाटील यांनी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्याकडे लेखी तक्रार केली. आगार व्यवस्थापक महाजन यांनी तात्काळ त्या परवानाधारक चहा विक्रेत्याला प्रत्यक्ष समोर बोलावून १ हजार रुपये दंड आकारणी केली. यापुढे यावल बस स्टॅन्ड परिसरात नाथजल पाण्याची बाटली १५ रुपये दराने विक्री करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष आकाश सतीश चोपडे, शहराध्यक्ष योगेश पाटील, उपजिल्हाध्यक्ष जुगल पाटील, ज्ञानेश्वर सुरवाडे, दिलीप हेगडे चेतन सपकाळे, विशाल कोळी इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.