आरोपी २४ तासांत अटकेत
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेडी बुद्रुक येथील माऊली नगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून चॉपरने हल्ला करून एका व्यक्तीचा खून करण्यात आला, तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला. ही घटना २० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या गंभीर प्रकरणातील आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत ताब्यात घेतले आहे. मयूर चैत्राराम जाधव (रा. माऊली नगर, खेडी बुद्रुक, ता. जि. जळगाव) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी परिसरात काही महिला बसलेल्या होत्या. त्यावेळी आरोपी मयूर जाधव हा मोटारसायकलवरून तेथे आला होता. त्याच्या मोटारसायकलचा लाईट वारंवार सुरू-बंद होत असल्याने याबाबत जाब विचारण्यात आला. याच कारणावरून वाद निर्माण झाला. या वादातून आरोपीने धारदार चॉपरने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात किरण विठ्ठल पाटील (वय ४४, रा. माऊली नगर, खेडी बुद्रुक) यांचा मृत्यू झाला, तर किशोर छगन पाटील (वय ३५, रा. माऊली नगर, खेडी बुद्रुक) हे गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी जखमी किशोर छगन पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८६३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१), १०९(१), ३५१(२) आणि ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक माहिती संकलित केली. तसेच तांत्रिक तपास आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. या तपासाच्या आधारे गंभीर गुन्ह्यातील आरोपी मयूर चैत्राराम जाधव याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, गिरीष पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, पोलीस नाईक प्रदीप चौधरी तसेच पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी, रमाकांत साळुंखे, नितीन ठाकूर, राहुल घेटे, गणेश ठाकरे, किरण पाटील, शशिकांत मराठे, ललित नारखेडे आणि मोतीलाल बोरसे यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील करीत आहेत.









