भडगाव तालुक्यातील कजगाव येथील घटना
कजगाव ता.भडगाव (प्रतिनिधी) :- भडगाव तालुक्यातील कजगाव येथे भरधाव बसने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत साठ वर्षीय वृद्ध ठार झाला असून तरुण मुलगा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
कजगाव येथील पारोळा चौफुलीवर नेहमी रहदारी सुरु असते. शनिवारी वेगवेगळ्या दिशेने येणाऱ्या पुणे-एरंडोल हि एस. टी. महामंडळाची बस व दुचाकीचा भीषण अपघात दुपारी दोन वाजेच्या सुमारास झाला. यात दुचाकीस्वार असलेल्या साठ वर्षीय वृद्धांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर तरुणालाही गंभीर दुखापत झाली आहे. निंबा भिवसन कोळी (वय ६० वर्ष, रा. गुढे ता. भडगाव) असे मयत वृद्धाचे नाव आहे. तर प्रसाद रवींद्र चौधरी (वय १६ वर्ष, रा. पिलखोड ता. चाळीसगांव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. हे दोघे दुचाकीवर नंबर (एम. एच.१९ ऐ.एफ.३१२८) ने गोंडगावकडून कजगावकडे जात होते.
त्यांना पुणे-एरंडोल ह्या कजगावकडून भडगावकडे जाणाऱ्या एस. टी. बस क्रमांक (एम.एच .२० बी.एल.२६५२) ह्या वाहनाची जोरदार धडक झाली. त्यात दोन्ही दुचाकीस्वार हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना ग्रामस्थ व नातेवाईकांनी रुग्णवाहिकेतून चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. निंबा कोळी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना धुळे येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
अपघातातील तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. पारोळा चौफुलीवर झालेल्या जोरदार अपघातामुळे काही वेळ वाहतूकीची कोंडी झाली होती तर अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे दिसून आली. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.