जळगावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील जोशी पेठ येथील पतंगगल्लीत राहणाऱ्या बंगाली सोने कारागिराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दि. ११ एप्रिल रोजी उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मलाई जगई चक्रवर्ती (वय ३१ रा. पतंग गल्ली, जोशी पेठ, जळगाव) असे मयत बंगाली तरुण कारागिरीचे नाव आहे. मलाई चक्रवर्ती हा तरुण आई-वडील, पत्नी आणि सहा महिन्याच्या मुलासोबत वास्तव्याला आहे. वडीलांसोबत सोन्याचे दागिने बनवण्याचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान गुरुवार ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बाथरूममध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी तपासणी अंती मयत घोषित केले. दरम्यान आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. परंतु घरातील कर्ता पुरुष गेल्याने चक्रवर्ती कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकुलता एक मुलाने गळफास घेतल्याने कुटुंबाने एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.