जळगाव ( प्रतिनिधी ) — मेहरूण तलाव परिसरात जळगाव– पाचोरा रस्त्यावर गणपती विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर रस्ता बंद करून बॅरिकेड्स लावण्यात आले होते. या ठिकाणाहून जाण्यास मज्जाव केला असता दाम्पत्याने बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली. वाघनगर येथील दाम्पत्याविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गणपती विसर्जनाच्या पाश्र्वभूमीवर रविवारी जळगाव पाचोरा रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली होती. लेक रेसिडेन्सीजवळ विसर्जनासाठी जाणार्या नागरिकांनाही प्रवेश नाकारण्यात येऊन या ठिकाणी बॅरिकेट्स उभे करून रस्ता बंद करण्यात आला होता. याठिकाणी रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पो कॉ योगेश ठाकूर तसेच नागपुरातील महामार्गचे दिनेश माकरवार या दोन जणांना बंदोबस्तावर तैनात करण्यात आले. दुपारी राजेंद्र वाजपेयी हे त्यांची पत्नी एकता वाजपेयी हिच्यासोबत दुचाकी (क्रमांक एम.एच.१९ डी.आर. ७०२३ )वरून जात होते. लेक रेसिडेन्सी जवळ लावलेले बॅरिकेड्स बाजूला करून ते जाण्याचा प्रयत्न करत असतांना बंदोबस्तावरील योगेश ठाकुर यांनी वाजपेयी दाम्पत्याला मनाई केली . याचा राग आल्याने राजेंद्र वाजपेयी यांनी योगेश ठाकूर यांची कॉलर पकडून छातीत बुक्का मारला व शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. याचवेळी राजेंद्र वाजपेयी यांची पत्नी एकतासुद्धा पायातील चप्पल काढून पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर धाऊन आली. योगेश ठाकूर यांच्यासोबत असलेले दिनेश माकरवार यांनी वाजपेयी दाम्पत्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मन स्थितीत नव्हते. याचवेळी गस्तीवरील शहर वाहतूक शाखेचे वाहन जात होते त्यांनीही वाजपेयी दाम्पत्याला समजवण्याचा प्रयत्न केला. अखेर दोघेही ऐकून घेण्याच्या भूमिकेत नसल्याने पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत दाम्पत्याला ताब्यात घेत वाहतूक शाखेचे वाहनातुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेले. पो कॉ योगेश ठाकुर यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र वाजपेयी व एकता वाजपेयी या दाम्पत्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.