यावल शहरात घडली होती घटना
यावल ( प्रतिनिधी ) – शहरातील बाबूजीपुरा भागातील रहिवासी एका ५ वर्षीय अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार करीत त्याची हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या तरूणास मदत केल्याप्रकरणी तरूणाच्या काकाला सोमवारी पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यात आता संशयितांची संख्या २ झाली आहे. मुख्य संशयित हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे तर त्यांच्या काकाला न्यायालयाने ३ ऑक्टोबरपर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आली आहे.
शहरातील बाबूजी पुरा भागात एक पाच वर्षीय बालक हा ५ सप्टेंबर रोजी बेपत्ता झाला होता. ६ रोजी त्याचा मृतदेह त्याच्याशेजारी रहिवाशी शेख शाहिद शेख बिस्मिल्ला न्हावी (वय २२) या तरुणाच्या घरात मिळून आला होता. त्याने बालकावर लैंगिक अत्याचार करून त्याची गळा आवळून हत्या करून त्याला जाळून टाकले होते व मृतदेह पोत्यात लपवला होता. या घटनेची माहिती संशयित आरोपीच्या वडलांनी पोलिसांना देवून सदर मुलास पोलिसाच्या ताब्यात दिले होते. त्यास १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी न्यायालयीन कोठडीचे आदेश केले होते.
या गुन्ह्यात सदर संशयितास त्याचे काका शेख असलउल्ला गुलाम दस्तगीर न्हावी (वय ३५) यांनी मदत केल्याचे तपासात उघड झाले आहे. तेव्हा त्यांनादेखील पोलिसांनी अटक केली. त्यांना भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, हवालदार वासुदेव मराठे करीत आहेत.