अमळनेर न्यायालयाचा निर्णय, चोपडा तालुक्यात देवगाव येथे घडली होती घटना
अमळनेर ( प्रतिनिधी ) – किरकोळ वादातून बैलगाडीच्या लाकडी शिंगाड्याने मारहाण करून एकाचा जीव घेणाऱ्या आरोपीला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

ही घटना १४ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास देवगाव (ता. चोपडा) येथे घडली होती. फिर्यादी भावना रवींद्र पाटील यांचे पती रवींद्र पाटील हे दारूच्या नशेत असताना आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे याच्याशी त्यांचा वाद झाला. या वादाचा राग येऊन चंद्रशेखरने रवींद्र पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडले आणि जवळच असलेल्या बैलगाडीचे लाकडी ‘शिंगाडे’ काढून त्यांच्या पोटावर व पाठीवर गंभीर प्रहार केले.
उपचारादरम्यान १६ ऑक्टोबर २०२१ रोजी रवींद्र पाटील यांचा जळगाव येथील सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकारणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती सी. व्ही. पाटील यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी वकील अॅड. के. आर. बागुल यांनी या प्रकरणात एकूण ९ साक्षीदार तपासले. यामध्ये मयताची पत्नी, वडील आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. तसेच डॉ. निलेश देवराज यांनी दिलेला शवविच्छेदन अहवाल हा वैद्यकीय पुराव्यासाठी महत्त्वाचा ठरला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे याला दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त साधी कैद सुनावली आहे. या खटल्याच्या कामकाजात सरकारी वकील अॅड. के. आर. बागुल यांना पोलीस कर्मचारी सतीश भोई, उदयसिंग साळुंखे, पुरुषोत्तम वाल्डे, राहुल रणधीर, प्रमोद पाटील आणि भरत इशी यांनी सहकार्य केले.









