अमळनेर पोलीस स्टेशनची कामगिरी
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील बहादरवाडी येथील बोरी नदीतून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर अमळनेर पोलीस स्टेशनाने कारवाई केली असून तिन्ही ट्रॅक्टर व वाळूसह ९ लाख १८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तालुक्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीचे प्रमाण वाढलेले आहे आणि त्यावर कारवाई होत नसल्याची तक्रार परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांना प्राप्त झाली. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाने ३ मार्च रोजी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, पोलीस कॉन्स्टेबल विनोद संदानशिव, उज्वल मस्के, निलेश मोरे, प्रशांत पाटील यांच्या पथकाने बोरी नदीच्या काठावरील बहादरवाडी फाट्याजवळ सापळा रचला.
रात्री ११ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर क्रमांक एमएच १९ ए एन ४४६० वरील चालक रवींद्र बुवाजी भिल (वय ३०, रा. रुबजी नगर), ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९ बीजी ७०२९ वरील चालक अर्जुन शिवा पवार (वय २६ वर्ष, रा. हिंगोणा ता. अमळनेर), विना नंबर प्लेटचे लाल रंगाचे ट्रॅक्टर निळ्या रंगाची ट्रॉली असलेले, त्यावरील चालक किशोर शांताराम पाटील (वय २६ वर्ष, रा. हिंगोणा ता. अमळनेर) यांचे ट्रॅक्टर वाळूने भरलेल्या ट्रॉली पोलिसांनी ताब्यात घेऊन अंमळनेर पोलीस स्टेशनला जमा केले. वाळूसह तिन्ही ट्रॅक्टरची किंमत ९ लाख १८ हजार रुपये आहे. कॉन्स्टेबल उज्वल म्हस्के यांच्या फिर्यादीवरून तिन्ही संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संशयित आरोपी यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने एक दिवस पोलीस सुनावली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.