
अमळनेर (विशेष प्रतिनिधी): लडकी बहीण योजना आणि मोलमजुरीचे जमा झालेले पैसे दागिने करण्यासाठी वापरू, असे आमिष दाखवून एका ३० वर्षीय विवाहितेचे तिच्या ८ वर्षांच्या मुलासह अपहरण करून तिच्यावर सलग दोन महिने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.


तक्रारीनुसार, पीडित महिला ही अमळनेर तालुक्यातील रहिवासी असून ती शेतमजुरी करते. तिचे पती तिला सोडून गेलेले असल्याने ती आई-वडिलांकडे राहते. गावातील एका महिला कंत्राटदाराकडे काम करत असताना पीडितेने तिच्याकडे लडकी बहीण योजना आणि मजुरीचे मिळून एकूण ७०,००० रुपये जमा असल्याचे सांगितले होते. हे पैसे सोन्याचे दागिने करण्यासाठी वापरू, असे सांगून तिला अमळनेर येथे नेण्यात आले.
अमळनेर येथील मंगळग्रह मंदिराजवळ पोहोचल्यानंतर, संशयित आरोपी सुदाम भगवान भिल्ल (रा. कलाली, ता. अमळनेर) याने पीडितेला सोनार गल्लीत न नेऊन दुसऱ्याच गाडीत बसवले. तिने विरोध केला असता, “माझ्यासोबत आली नाहीस तर तुला आणि तुझ्या मुलाला मारून टाकीन,” अशी धमकी आरोपीने दिली.
त्यानंतर आरोपीने पीडितेला आधी बहाळ (चाळीसगाव) येथील एका कच्च्या झोपडीत १५ ते २० दिवस आणि नंतर शिरपूर जवळील विमानतळाशेजारील एका तांड्यावर सुमारे २ महिने डांबून ठेवले. या काळात मुलाला जीवे मारण्याची भीती दाखवून आरोपी तिच्यावर सातत्याने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवत होता.
१६ जून २०२६ रोजी आरोपी सुदाम काही कामानिमित्त बाहेर गेला असता, पीडितेने प्रसंगावधान राखून मुलासह तिथून पळ काढला. तिने खाजगी वाहनाने शिरपूर तालुक्यातील कमखेडा येथील आपल्या बहिणीचे घर गाठले आणि घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांच्या सल्ल्याने अखेर तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अपहरणाचा व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) विनायक कोते यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. मारवड पोलीस ठाण्याचे सपोनि साजिद मजिद मन्सूरी यांनी तातडीने चक्र फिरवून आरोपी सुदाम भगवान भिल्ल याला १४ जुलै २०२६ रोजी रात्री २१:३७ वाजता अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.









