
शिरसोली (प्रतिनिधी): येथील राममंदिर परिसरातील रहिवासी असलेल्या एका २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज, बुधवार (दि. १५) रोजी सकाळी घडली. नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त होत असले, तरी आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.


निवृत्ती गोकुळ बोबडे (वय २८, रा. शिरसोली प्र.न., राममंदिर जवळ, ता. जि. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्ती बोबडे याने आज बुधवार रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर लोखंडी रॉडला दोरी बांधून गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच शिरसोलीचे पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस पाटील बारी यांनी घटनेची माहिती जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (सिव्हिल हॉस्पिटल) पाठवण्यात आला आहे. मृत निवृत्तीच्या पश्चात आई, वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे शिरसोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, एमआयडीसी पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









