तुकारामवाडीतील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील तुकारामवाडी येथील ७२ वर्षीय प्रौढाने राहत्या घरी छताला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दि. १० जून रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अशोक मुरलीधर मावळे (वय ७२, रा. तुकाराम वाडी, जळगाव) असे मयत व्यक्तींचे नाव आहे. ते तुकाराम वाडीत पत्नी, मुलगा यांच्यासह राहत होते. त्यांची विवाहित मुलगी पुण्यात राहते. तर मुलगाहि नोकरीनिमित्त पुण्यात आहे. अशोक मावळे हे पूर्वी एका वर्कशॉपला काम करायचे. सध्या ते घरीच होते. दरम्यान, सोमवारी सकाळी त्यांनी राहत्या घरी छताला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे कुटुंबियांना लक्षात आले.
त्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासून मयत घोषित केले. यानंतर नातेवाईकांनी शोक व्यक्त केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.