जळगावातील दुपारची घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात मारहाण केल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. तेव्हा त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र त्यानंतर पोलिसांची नजर चुकवून तो फरार झाल्याची घटना बुधवार दि. १२ जून रोजी संध्याकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस संशयित आरोपीचा शोध घेत आहे.
भोलासिंग जगदीशसिंग बावरी (३२, रा. तांबापुरा, जळगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. भोलासिंग बावरी याने दिनांक ११ जून रोजी भंगार विक्रेत्याला मारहाण करून तीन हजार रुपये काढून तो पसार झाला होता. त्याला शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोउनि मुबारक तडवी, पोकॉ राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे यांनी अटक केली होती. त्याला बुधवार दिनांक १२ जून रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर न्यायालय परिसरात तो पोलिसांची नजर चुकवून पळून गेला. यावेळी अचानक घडलेल्या घटनेने पोलीस गांगरून गेले मात्र न्यायालयाच्या गेटमधून तो बाहेर पळून जाण्यात यशस्वी झाला.
सदर घटनेला पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी दुजोरा दिला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती दिली. बावरी याच्यावर यापूर्वीही एमआयडीसी, रामानंद नगर, जिल्हा पेठ पोलिस ठाणे तसेच भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे या ठिकाणी घरफोडी, खंडणी, गंभीर दुखापत करणे, विनयभंग असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. चार दिवसांपूर्वीच तो न्यायालयातून जामिनावर बाहेर आला आहे.