अहमदाबाद (वृत्तसंस्था ) ;- गुजरातमध्ये एका ट्रक चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटले. त्यामुळे या अपघातात 10 मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात एका रस्त्याच्या बाजूला एका झोपडपट्टीत काही मजूर राहत होते. ट्रक चालकाला झोप आली, त्यात त्याचे गाडीवरून नियंत्रण सुटले आणि झोपडीमध्ये ट्रक घुसला. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्त्यू झाला. इतर दोन गंभीर जखमी झाले होते, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 8 आणि 13 वर्षाच्या दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ट्रक चालकाला अटक करून ट्रक ताब्यात घेतला. ट्रक चालक दारू पिऊन तर गाडी चालवत नव्हता ना याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केले आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देऊन त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री रुपाणी यांनी दिल्या आहेत.