अमळनेर तालुक्यातील पाडसे रस्त्यावरील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील चौबारी जवळ पाडसे रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकीने ८ वर्षीय मुलीला धडक दिल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी पळून जाणाऱ्या चालकाला गावकऱ्यांनी पकडत चोप देवून मारवड पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगीता विजय नाईक ह्या मुलगी रेखमा विजय नाईक (वय ८) हिच्यासोबत दिनांक २६ रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास पाडसे रस्त्याच्या कडेने विहिरीवर पाणी भरण्यास जात होते. त्यावेळी पाडसे कडून चौबारीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने (क्रमांक एमएच ०२ बीजे ५४२०) भरधाव वेगाने जात रेखमा हिला धडक दिली. सदर वाहनचालक अमळनेरच्या दिशेने पळून गेला. मुलीचे वडील विजय नाईक व ग्रामस्थांनी मुलीकडे धाव घेत तिला खाजगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
सदर घटनेप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ शरीफ पठाण हे करीत आहेत. दुर्घटना झाल्याचे व चालक पळून गेल्याचे कळताच काही ग्रामस्थांनी अमळनेरकडे धाव घेतली. व सदर वाहनचालकाला पकडत चोप दिला. यावेळी मारवड पोलिसांनी सदर चालकास व वाहनाला ताब्यात घेतले आहे. विकास प्रकाश वानखेडे (वय २५, रा. भालेगाव ता. मलकापूर जि. बुलढाणा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला शुक्रवारी अमळनेर सत्र न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर केला आहे.