दोन जण ठार ;एक जण जखमी
जळगाव ( प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी – गोदेगाव दरम्यान दुचाकींची समोरासमोर धडक होऊन या अपघातात दोन जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. दीपक रामदास गायकवाड वय २५ रा.डकला. ता.सिल्लोड जि. औरंगाबाद व दिनेश मदन जाधव वय २३ रा गोंदेगाव तांडा ता.सोयगाव अशी मयतांची नावे आहेत. तर या अपघातात कृष्णा उत्तम सोनवणे रा. डकला.ता.सिल्लोड हा जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारार्थ खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
दीपक गायकवाड हा मित्र कृष्णा सोनवणे यांच्यासोबत दुचाकीने रविवारी त्याची जामनेर तालुक्यातील जोगलखेडा येथील बहीण राधाबाई हिच्या भेटीसाठी गेला होता. तेथून परतत येत असताना शेंदुर्णी गावाजवळ समोरून भरधाव येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने धडक दिल्याने या अपघातात दीपक याचा जागीच मृत्यू झाला तर कृष्णा हा जखमी झाला आहे. तर धडक देणाऱ्या दुचाकीवरील दिनेश मदन जाधव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. दोघे मयतांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान मयत दीपक यांच्या पश्चात आई सुशिलाबाई , वडील रामदास पांडुरंग गायकवाड , दोन भाऊ करण व दत्तु , ३ विवाहित बहिणी , पत्नी उषाबाई, तीन मुले गणेश , निलेश व दिनेश व मुलगी निखिता असा परिवार आहे . पुढील तपास पोलीस करीत आहे.