जळगाव तालुक्यातील कानळदा येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – मालवाहू ॲपे रिक्षाने कामावरून घरी जात असलेल्या तरूणाच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. ही घटना जळगाव तालुक्यातील कानळदा गावानजीक घडली आहे. तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
कपिल अशोक सपकाळे (वय २४, रा. कठोरा ता.जि.जळगाव) असं मयत तरूणाचं नाव आहे. कपिल हा तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ तसेच घरातील कर्ता पुरूष होता. तालुक्यातील कठोरा गावातील रहिवासी असलेला कपील सपकाळे हा आपल्या आई आणि वडिलांसोबत वास्तव्याला होता. जळगाव शहरात खासगी नोकरीला होता. नेहमीप्रमाणे काल शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कपिल हा त्याच्या एमएच १९ एजे ६२८४ या क्रमाकांच्या दुचाकीने घरी जाण्यासाठी कानळदा मार्गे कठोरा येथे जाण्यासाठी निघाला होता. रस्त्यावरील कानळदा गावाजवळून जात असताना एका अज्ञात मालवाहू ॲपे रिक्षा (क्रमांक एमएच १९ एस ७९००)ने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत कपिलचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. खिशातील कागदपत्राच्या आधारे त्याची ओळख पटली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मालवाहू रिक्षा ताब्यात घेतली आहे. तर मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान, मयत लोकेशच्या पश्चात आई, आजाराने ग्रस्त असलेले वडील आणि विवाहित तीन बहिणी असा परिवार आहे. भावाचा मृतदेह पाहिल्यावर बहिणींनी एकच आक्रोश केला. गावात शोककळा पसरली आहे.