शिंदे सेनेची भक्कम उमेदवारी जाहीर, निवडणुकीत नवीन समीकरणांची चिन्हे
अमळनेर (प्रतिनिधी) – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेने आपल्या दमदार तयारीची झलक दाखवत ३० शिवसेना उमेदवारांसह १ अपक्ष व २ पुरस्कृतांची प्रभावी यादी जाहीर केली असून यामुळे शहरातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. या उमेदवारी घोषणेत सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर यांचे. माजी आमदार शिरीष चौधरी यांनी त्यांना “अमळनेरचा कोहिनूर हिरा” असे गौरवपूर्ण वर्णन देत सभागृहात उत्साहाची लाट निर्माण केली.
पत्रकार परिषदेत बोलताना चौधरी म्हणाले की, विरोधकांनी कितीही अफवा पसरवल्या किंवा खोटे आरोप केले तरी शिंदे सेनेने स्वच्छ प्रतिमा व जनसेवेची निष्ठा जपणाऱ्या उमेदवारांनाच उमेदवारी दिली आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार आम्ही जनतेला त्रास न देणारे, विकासाभिमुख नेतृत्व पुढे आणले आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी के. डी. बापू दादा पवार, पंकज चौधरी, सुरेश पाटील यांसह महिला आघाडी, युवा सेना आणि विविध विभागांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत सर्वांनी डॉ. बाविस्कर यांच्या उमेदवारीचे स्वागत करत अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी एकदिलाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
“अमळनेरला शिरपूर–इंदोरसारखा आधुनिक विकास देणार” — डॉ. बाविस्कर
नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी आपल्या विकासदृष्टीची स्पष्ट मांडणी केली. “माझे बालपण, माझे संस्कार, माझे जगणे—सगळं अमळनेरमध्येच घडले. हे शहर माझ्यासाठी फक्त मायभूमी नाही, तर माझ्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू आहे. आता या शहराला शिरपूर व इंदोरसारखा नियोजनबद्ध, आधुनिक आणि प्रगत विकास देण्याचे माझे स्वप्न आहे,” असे ते म्हणाले.
अमळनेर हे आकाराने लहान असले तरी येथे जगातील सर्वाधिक शेअरधारकांचे प्रमाण आहे, यावर भर देत त्यांनी शहरात महापालिका स्तराचा विकास करण्याची क्षमता असल्याचे सांगितले. त्यांनी रस्ते–गटारे, पाणीपुरवठा, शहर सुशोभीकरण, महापुरुष स्मारकांचे संवर्धन, रोजगारनिर्मिती व आधुनिक शहरी सुविधा यांसाठी व्यापक आराखडा मांडला.









