टँकरचालकाचाही मृत्यू, अकोला जिल्ह्यातील घटनेत जळगावच्या महिलेचा मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) : अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर जवळील राष्ट्रीय महामार्गावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ जळगाव येथील भरधाव कार रस्त्यावर उभ्या असलेल्या पाण्याच्या ट्रॅक्टरच्या टँकरला जोरदार धडक दिल्याने २ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. मयत दोघांमध्ये जळगाव येथील महिलेचा समावेश आहे. याबाबत माना पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव येथील रिंगरोड परिसरातील रहिवासी अल्पना पराग लिमये (वय ५६) यांचा घटनेत मृत्यू झाला तर त्यांचे पती पराग नागेश लिमये (वय ५७) हे गंभीर जखमी झाले आहे. (केसीएन)लिमये दाम्पत्य हे अमरावती येथून रविवारी दि. १६ मार्च रोजी दुपारी काम आटपुन जळगावकडे परत जात होते. दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील कुरूमन गावाजवळील रस्त्यावर झाडांना पाणी देण्यासाठी उभे असलेल्या ट्रॅक्टरचे टँकरला लिमये यांची कार क्रमांक (एमएच १९ बीजे ३९४१) ने जोरदार धडक दिली.
या अपघातात अल्पना लिमये यांच्या डोक्याला गंभीर मार बसल्याने व पायाला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर पराग लिमये यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने मूर्तीजापुर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर दुखापत असल्याने पराग यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील खाजगी रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.(केसीएन) तर झाडांना पाणी टाकत असलेले घामोरी बुद्रुक येथील ट्रॅक्टर चालक सुनील ठाकरे (वय ४८) याचाही मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच माना पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.