न्यायालयाचे आदेश, अमळनेर तालुक्यातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील दहिवद खुर्द येथील ३२ वर्षीय तरुणाचा एप्रिल महिन्यात संशयास्पद मृतदेह लोणे भोणे फाट्याजवळ आढळला होता. याप्रकरणी नातेवाईकांनी मित्रावर संशय व्यक्त केला होता. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. नातेवाईक न्यायालयात गेले. अखेर न्यायालयाच्या आदेशाने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अमळनेर पोलीस अधिकारी अधिक तपास करीत आहेत.
प्रवीण पांडुरंग पाटील असे मयत तरुणाचे नाव आहे. जुन्या वादातून त्याचे त्याचा मित्र संशयीत आरोपी अशोक उर्फ रिंकू प्रकाश पाटील (रा. दहिवद,पो. टाकरखेडा ता. अमळनेर) याच्याशी वाद होत होते. दि. २२ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता अशोक पाटील याने प्रवीण पाटील याला दुचाकीवर बसवून कोठेतरी नेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तो घरी परत न आल्याने त्याच्या घरच्यांनी शोधाशोध केली प्रवीण पाटील याच्या आईने संशयित अशोक पाटील याला फोन लावला असता, फोन बंद येत होता. त्यामुळ प्रवीणची काहीच माहिती मिळत नव्हती. दरम्यान सकाळी लोणे भोणे फाट्याजवळ प्रवीण पाटील याचा संशयास्पद मृतदेह मिळून आला होता. त्यावेळी त्याच्या अंगावर विविध ठिकाणी मारहाणीच्या जखमा दिसून येत होत्या.
मात्र त्यावेळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. नातेवाईकांनी खून झाला आहे, असा आरोप करून संशयिताला अटक करावी अशी मागणी केली. नंतर नातेवाईक हे न्यायालयात गेले. न्यायालयाने वस्तुस्थिती समजून घेत अमळनेर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार दि. ३० सप्टेंबर रोजी संध्याकाळी पावणे सहा वाजता प्रवीण पाटील याची आई इंदुबाई पांडुरंग पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अशोक उर्फ रिंकू पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहे.