मालेगाव बायपास चौफुलीचे अहिल्यादेवी होळकर उड्डाणपूल नामकरण
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – प्रेरणास्थान, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे २०२५ हे त्रिशताब्दी जयंती महोत्सवी वर्ष असून त्यांच्या नावाने चाळीसगाव तालुक्यात दोन भव्य सभागृह उभारण्याच्या शब्द आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला होता. त्यानुसार आज रविवार दि. १६ मार्च रोजी इंदोर साम्राज्याचे संस्थापक मल्हाररावजी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बिलाखेड येथे चाळीसगाव तालुक्यातील पहिल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक सभागृहाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
तसेच रा.म.२११ मालेगाव बायपास चौफुली येथील उड्डाणपुलाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उड्डाणपूल असे नामकरण आ. चव्हाण व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आ. चव्हाण यांची साखरतुला करण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाचे बिलाखेड येथील पदाधिकारी संदीप देवरे यांनी केला होता. आज सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी आ. चव्हाण यांची साखरतुला केली.
यावेळी धनगर समाजाचे नेते नवनाथ ढगे यांच्यासह तालुक्यातील धनगर समाज बांधव, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसेच बिलाखेड सरपंच, उपसरपंच, ग्रा पं सदस्य व ग्रामस्थ मंडळी, उपस्थित होते.