जळगाव ते शिरसोलीदरम्यानची घटना
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव ते शिरसोली डाऊन रेल्वे लाईनवर धावत्या रेल्वेतून पडल्याने एका २९ वर्षीय परप्रांतीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दिनांक २२ जून रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी रविवारी दिनांक २३ जून रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संदीप प्रजापत (वय २९ रा. सुरजपूर , उत्तरप्रदेश) असे मयत तरूणाचे नाव आहे. की, जळगाव ते शिरसोली डाऊन रेल्वे लाईनवरील रेल्वे खंबा क्रमांक ४०३ च्या २३ जवळ एका धावत्या रेल्वेतून संदीप प्रजापत हा पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी २२ जून रोजी रात्री ९.३० वाजता घडली आहे. या घटनेची माहिती शिरसोली रेल्वे स्टेशनचे उपस्टेशन प्रबंधक सौरभकुमार यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची माहिती कळविली.
त्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोहेकॉ अनिल फेगडे, संजय भालेराव आणि मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तरूणाच्या खिश्यात मिळालेल्या मोबाईलवरून संदीप प्रजापत असे नाव असल्याचे समोर आले. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी रविवारी २३ जून रोजी मध्यरात्री १ वाजता तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे हे करीत आहे.