जामनेर तालुक्यातील सोनाळा फाटा जवळची घटना
जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील पहूर ते सोनाळा मार्गावर भरधाव इंडिका कारने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात एक तरुण ठार झाला असून त्याचे दोन सख्खे भाऊ आणि एक तरुण असे तीन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.
गजा कालूराम बारेला (वय २५, रा. ठाठर कमला ता.जि. बऱ्हाणपूर) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, आणि दोन भाऊ आहेत. (केसीएन) तीन महिन्यांपूर्वी गजा बारेला हा मोठा भाऊ अजय काळूराम बारेला (वय ३०) लहान भाऊ राजू कालूराम बारेला (वय २५) तसेच नातेवाईक दशरथ बहादूर बारेला (वय २०) यांच्यासह मजुरीसाठी जामनेर तालुक्यातील सोनाळा येथे आनंदा नामक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये राहायला आले होते. तीन महिन्यापासून त्यांचा मुक्काम सोनाळा येथेच आहे.
पहूर येथे रविवारी दि. १४ जुलै रोजी दुपारी बाजारनिमित्त अजय, गजा आणि राजू हे सखे भाऊ आणि दशरथ बारेला अशी चौघेजण एकाच दुचाकी वर गेलेले होते. खरेदी करून झाल्यावर सोनाळा येथे परत येत असताना संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या इंडिका कारने दुचाकीला जबर धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला.
जखमींना सुरुवातीला पाहून येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र तिथून संध्याकाळी पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या ठिकाणी गजा कालूराम बारेला याला वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी तपासून मयत घोषित केले तर अजय बारेला, राजू बरेला आणि दशरथ बारीला यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान गजा याच्या मृत्यूची माहिती कळताच कुटुंबीयांनी आक्रोश केला. (केसीएन)दरम्यान अपघाताची माहिती पहुर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घेत होते त्या ठिकाणी घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.