
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव-नेरी मार्गावरील उमाळा घाटाजवळ गुरुवारी सायंकाळी एक अत्यंत भीषण अपघात घडला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका नादुरुस्त ट्रकला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. दरम्यान, ज्या ट्रकमुळे हा अपघात झाला, त्याच्या मागील बाजूस लिहिलेला “वन मिस्टेक गेम ओव्हर” हा संदेश घटनास्थळी उपस्थितांमध्ये मोठ्या चर्चेचा विषय ठरला होता.


या अपघातात इस्राईल शेख इरफान (वय २१, रा. अजिंठा) आणि पंकज हरीष बैंडवाल (रा. इंदूर) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रदीप ऊर्फ छोटू ओमप्रकाश परदेशी हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यासह गिरीश योगेश चव्हाण (रा. खेडी), गौरव राजू परदेशी (रा. इंदूर) आणि अनुज रामावत परदेशी (रा. खेडी) यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

हा अपघात प्रामुख्याने ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. संबंधित ट्रक रस्त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जळगाव-नेरी मार्गावर उभा करून ठेवण्यात आला होता. परंतु, महामार्गावरील नियमांनुसार ट्रकच्या पाठीमागे कोणताही रिफ्लेक्टर, रात्री चमकणारा इशारा फलक किंवा बॅरिकेड्स लावण्यात आले नव्हते. सायंकाळच्या वेळी अंधार पडत असताना समोरून येणाऱ्या कार चालकाला हा उभा ट्रक वेळेत न दिसल्याने ही भीषण दुर्घटना घडली.
परदेशी कुटुंबातील हे तरुण बांधकाम व्यवसायाशी संबंधित असून ते आपल्या अजिंठा येथील साईटकडे कारने जात होते. त्यांची कार उमाळा घाटाजवळ पोहोचली असता रस्त्याच्या मार्गिकेत उभा असलेला ट्रक अचानक समोर आला. कार चालकाने अत्यंत वेगाने गाडी वळवून अपघात टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेगावरील नियंत्रण सुटल्याने कार आधी दुभाजकावर आदळली आणि त्यानंतर सुमारे पन्नास ते साठ फूट दूर जाऊन रस्त्याच्या कडेला आदळली.
अपघातानंतर घटनास्थळी मोठा थरकाप उडाला होता. जखमींना वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांना थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, सुरुवातीला कोणीही मदतीसाठी गाडी थांबवली नाही. अखेर अर्ध्या तासानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू आहे.









