जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील उमाळा या ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार होत असल्याबाबत गटविकास अधिकारी यांनी चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समिती मधील दोन विस्तार अधिकाऱ्यांनी तक्रारदार लोकसेवक यांना पाच लाख रुपयांची लाच घेताना मंगळवार दि. १४ नोव्हेंबर रोजी शहरातील शिवतीर्थ मैदानाजवळील कार्यालयात रंगेहात पकडले आहे. लाचालूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही धडक कारवाई केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
पद्माकर बुधा अहिरे (वय ५३) आणि रवींद्र शालिग्राम सपकाळे (वय ५५) हे दोन्ही विस्तार अधिकारी आहेत. उमाळा येथे ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार होत असल्याबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार आलेली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी चार सदस्य समिती गठित केली होती. या समितीमध्ये पद्माकर अहिरे व रवींद्र सपकाळे हे अध्यक्ष व उपाध्यक्ष होते. या समितीचे कामकाज सुरू होते. दरम्यान चौकशी समितीचा अहवाल हा सकारात्मक यावा यासाठी ग्रामपंचायत मधील लोकसेवकाकडून दोन्ही विस्तार अधिकारी यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती.
गेल्या तीन दिवसांपासून सदर लोकसेवक हे त्यामुळे चिंताग्रस्त झाले होते. अखेर त्यांनी कंटाळून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दाखल केली. त्यानुसार जळगावच्या विभागाने मंगळवारी १४ रोजी जळगाव शहरातील शिवतीर्थ येथे विद्यानिकेतन शाळेच्या परिसरात सापळा रचला. त्या ठिकाणी संबंधित लोकसेवकाकडून पाच लाख रुपयांची लाच घेत असताना दोन्ही विस्ताराधिकारी पद्माकर अहिरे आणि रवींद्र सपकाळे यांना रंगेहाथ अटक करण्यात आले आहे.
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव बाळू मराठे, सुनील वानखेडे, राकेश दुसाणे, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक किशोर महाजन, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर आदींच्या पथकाने यशस्वी केला.