चाळीसगाव तालुक्यात खडकी बायपासवर सकाळची घटना, ग्रामस्थांचा रास्ता रोको
चाळीसगाव(प्रतिनिधी) :- तालुक्यातील खडकी गावाजवळ खडकी बायपासवर एक भीषण अपघात घडला. शेतासाठी खत घेऊन मोटारसायकलवरून निघालेल्या शेतकऱ्यांच्या दुचाकीला आयशर वाहनाने जबर धडक दिली. या धडकेत एक शेतकरी ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
आबा जानराव-धनगर (वय ३५ वर्ष, रा. खडकी ता. चाळीसगाव) यांचा आयशर वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेती काम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्यासोबत असलेले भगवान कोल्हे (वय २६ वर्ष) हे गंभीर जखमी झाले आहेत. (केसीएन)सध्या त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर संतप्त खडकी ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून तीव्र रास्ता रोको आंदोलन केले.यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला असून वाहनांची रांग लागलेली आहे. शहर पोलिस व वाहतूक शाखेचे अधिकारी- कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आयशर वाहन अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.