जळगाव तालुक्यातील महिनाभरातील दुसरी घटना
जळगाव प्रतिनिधी) : शहरातील आव्हाणे रस्त्यावर लक्ष्मी जिनिंगच्या मागील बाजूस ठेकेदाराकडे काम करणाऱ्या कामगाराचा डोक्यात धारदार वस्तूने वार करून निर्घूण खून करण्यात आल्याची घटना शनिवार दि. २० एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांसह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे.
सुरेश सोलंकी (वय ४५, रा. दुहीशेतला ता. सेंधवा, जि. बडवानी, मध्य प्रदेश) असे मयत इसमाचे नाव आहे. तो लक्ष्मी जिनिंगच्या परिसरामध्ये ठेकेदाराकडे मजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. शनिवारी दुपारी लक्ष्मण पाटील यांच्या मालकीच्या लक्ष्मी जिनिंगच्या मागील बाजूस प्लास्टिकच्या पिवळ्या फटवर डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्याचा निर्घूण खून करून मृतदेह फेकून दिल्याचे उघडकीस आले.
यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित आदींनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव या ठिकाणी रवाना करण्यात आला आहे.
दरम्यान, हा खून नेमका कोणत्या कारणासाठी व कोणी केला याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक कामाला लागले असून रात्री उशिरापर्यंत हा गुन्हा उघडकीस येईल, अशी माहिती एलसीबी चे निरीक्षक किसन नजन पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, असोदा शिवारात मृतदेह आढळल्यानंतर आता आव्हाणे रस्त्यावर पुन्हा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.