या जीवनात कुणीही असो, कोणताही जीव असो, त्याचा आत्मा एक असतो. फक्त आत्म्यास लागलेल्या कर्म मळाचा काय तो तेव्हडा फरक असतो. आपण तर मनुष्य जन्मात जन्मलो आहोत; भवी जीव आहोत. आत्म्याला चिकटलेले कर्म दोष काढण्याचा पुरुषार्थ प्रत्येकाने करायला हवा असे आवाहन प.पू. सुमित मुनीजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवचनाच्या माध्यमातून केले.
शरीराचा मळ निघावा यासाठी नानापरीचे साबण बाजारात उपलब्ध आहेत, आपण ते वापरतो. खरच त्याने मळ निघतो का? स्वच्छ होत ही असेल परंतु आतील आत्म्याला आपण स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो का? आत्मा स्वच्छ करण्याचा असा कोणता साबण तुमच्याकडे उपलब्ध आहे का? कर्म मळ कसे स्वच्छ करावे हा मुलभूत प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल. त्यासाठी पुरुषार्थ करावा लागतो. आज काल जन्म आणि मरण दोन्ही ही महाग झाले आहेत. सिझेरियन शिवाय जन्म होत नाही आणि व्हेंटिलेटर शिवाय मृत्य होत नाही. मग कर्म दोष डोक्यावर घेऊन उगिच जन्म-मरणाच्या फेऱ्यात का अडकावे? आत्म्यास लागलेला कर्म मळ स्वच्छ करण्याचा संकल्प सर्वांनी करावा असे आवाहन ही यावेळी करण्यात आले.
परमपुज्य भूतीप्रज्ञ म.सा. यांनी देखील आत्मा आणि कर्म याबाबत कथन केले. आत्मा शरीर रुपी पेटीमध्ये पारस आहे. त्याच्या सभोवताली कर्मरुपी कागद चिकटला आहे त्यामुळे पारस असून देखील लोखंडाचे सुवर्णात परिवर्तन होत नाही. सम्यक ज्ञानाने आत्म्यावर आलेला मळ, अंधःकार दूर होतो. तो अंधःकार दूर करण्याचा प्रयत्न करावा असे सांगण्यात आले.
स्वाध्याय भवन, जळगाव-महाराष्ट्र.
१० सप्टेंबरः २०२४