नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – मोदी सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपयांची कपात केली आहे. उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने राज्यांना देखील व्हॅट कमी करून ग्राहकांना दिलासा देण्याचे आवाहन केले आहे.
भारतातील बहुतेक शहरांमध्ये पेट्रोल १०० रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले आहे आणि जवळपास दररोज ३५ पैशांनी महाग होत आहे. ४ ऑक्टोबर २०२१ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत पेट्रोलच्या दरात सरासरी ८ रुपयांनी वाढ झाली आहे.
केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क आकारते. जे संपूर्ण भारतात एकसमान आहे. मात्र यावर आकारले जाणारे व्हॅटचे दर राज्यानुसार भिन्न आहेत. राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर देशात सर्वाधिक व्हॅट आहे. राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे. काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलने १०० रुपयांचा पल्ला गाठला आहे. काही शहरात तर पेट्रोलने ११० रुपयांची पातळी ओलांडली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे महागाईही वाढली आहे.