दीड लाखांची फसवणूक करणाऱ्या भोंदू महिलेचा अंनिसकडून पुण्यात पर्दाफाश
पुणे (प्रतिनिधी) :- शहरातील पाषाण येथे कन्सल्टन्सीच्या नावाखाली जादुटोणा करत दीड लाखांची फसवणूक करणाऱ्या वृषाली ढोले-शिरसाठ या महिलेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, चतु:श्रृंगी पोलिस आणि पीडित व्यक्तीने स्टिंग ऑपरेशन करून पर्दाफाश केला आहे. दरम्यान, ढोले-शिरसाठ यांनी कोणतीही समस्या न विचारता हातात गंडा बांधून राख खाण्यास दिल्याचे फिर्यादीने जबाबात म्हटले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी वृषाली संतोष ढोले (रा. साई चौक, पाषाण), माया राहुल गजभिये (रा. विठ्ठलनगर, सुतारवाडी रोड, पाषाण) आणि सतीश चंद्रशेखर वर्मा (रा. पाटीलनगर, बावधन) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी २३ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०२१ ते १६ डिसेंबर २०२३ पर्यंतच्या कालावधीत मुक्ता रेसिडेन्सी, सुतारवाडी, पाषाण येथे घडला आहे. याप्रकरणी जादूटोणा विरोधी कायदा कलम ३(२) सह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जगन्नाथ जानकर, सहायक पोलिस निरीक्षक संभाजी गुरव आणि पोलिस उपनिरीक्षक विद्या पवार करत आहेत.
नैराश्यग्रस्तांना नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी व यश मिळवण्यासाठी समुपदेशन केले जाईल, अशी जाहिरात सोशल मीडियाच्या माध्यमातून करत लोकांकडून लाखो रुपये उकळले जात असल्याचे तरुणाने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्याला नैराश्य आले. सोशल मीडियावर त्याला या समुपदेशनाबाबत समजले. फिर्यादी वृषाली ढोले यांच्याकडे गेला असता, स्पर्धा परीक्षेत यश मिळण्यासाठी तरुणाला औषधोपचार घेण्यापासून रोखून त्याला गंडेदोरे बांधून राख खायला दिली. त्यानंतर पाय धुतलेले पाणी प्यायला दिले. तसेच, स्वत:च्या अंगी अतिंद्रिय शक्ती असल्याचे भासवून युवकाला मृत्यूची भीती घातली. असे करत संबंधित युवकाची सुमारे दीड लाख रुपयांची फसवणूक करून त्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून १ लाख ५० हजार रुपये उकळले आहेत.
तरुणाने यासंबंधीची तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते विशाल विमल यांच्याकडे करत, सदर महिला आणि तिचे साथीदार हे जादुटोणा, भोंदूगिरी आणि फसवणूक करत असल्याचे सांगितले. यानंतर अंनिसच्या पुणे शहर शाखेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची शहानिशा केली. त्यानंतर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. १६) विशाल विमल हे पीडित युवक व साध्या वेशातील पोलिसांसोबत सदर महिलेच्या कार्यालयात उपचारासाठी गेले.
रिसेप्शनवर माया गजभिये आणि सतीश वर्मा हे बसले होते. विशाल यांना कन्सल्टिंग फी १ हजार रुपये भरण्यास लावून, त्यांना आतमधील रूममध्ये जाण्यास सांगितले. आतमध्ये बसलेल्या वृषाली ढोले-शिरसाठ यांनी कोणतीही समस्या न विचारता विशाल यांच्या हातात गंडा बांधून राख खाण्यास दिली. संबंधित महिला ही अघोरी, अनिष्ठ, जादुटोण्याचा प्रकार करून लोकांना फसवत असल्याची विशाल यांचीही खात्री झाल्याने त्यांनी पोलिसांना आतमध्ये बोलवले. पोलिसांनी आतमध्ये येत पंचनामा करुन जादुटोण्याच्या वस्तू जप्त केल्या.