जळगाव ( प्रतिनिधी ) – शहराच्या राजकारणात गेल्या २ दिवसांपासून घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज आमदार गिरीश महाजनांचे ‘ मिशन महापालिका ‘ यशस्वी झाल्याची प्रचिती आली असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार अत्यंत शांतपणे आणि गोपनीय मार्गाने या मिशनची सुरुवात आमदार गिरीश महाजन यांनी ३ महिन्यांपूर्वी केली होती . फारच आवश्यक असेल त्यावेळी आमदार राजूमामा भोळे यांची मदत घेतली जात होती . मात्र आमदार गिरीश महाजन यांनी या मोहिमेचे कर्णधार म्हणून आपले निष्ठावंत समर्थक अरविंद देशमुख यांना निवडलेले होते . अरविंद देशमुख आणि जळगावातील ज्येष्ठ नगरसेवक या तिघांनी सगळी व्यूहरचना केलेली होती.
हे ज्येष्ठ नगरसेवक आणि अरविंद देशमुख यांना फुटीर नगरसेवकांच्या मत परिवर्तनासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांसाठी स्वतंत्रपणे आणि महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार आमदार गिरीश महाजन यांनी दिलेले होते . यावेळी कुठेच गवगवा होणार नाही अशी दक्षता घेत माध्यमे आणि विरोधकांनाही सुगावा लागू न देता , गोंधळ न वाढवता या मिशनचा प्रत्येक टप्पा यशस्वी अरविंद देशमुख यांनी केला. भाजप सोडून गेलेल्या या नगरसेवकांना एका छताखाली आणताना त्यांची नाराजी बाजूला करून त्यांच्यात विश्वास निर्माण करण्यात अरविंद देशमुख यशस्वी झाले.आहेत यावेळी पडद्याआड राहून हे यश मिळवले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर आज महापालिका महासभा रद्द झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार राजूमामा भोळे यांनी घेतलेला सावध पावित्रा एक प्रकारे या मिशनच्या गोपनीयतेचाच परिपाक होता. अशी चर्चा आता सुरु आहे. त्यांनी फक्त सुबह का भूल श्याम को घर आये तो उसे भूल नही कहते , अशा साध्या शब्दात भाजपमध्ये परतलेल्या नगरसेवकांचे स्वागत केले होते. आणि विकासासाठी सगळ्यांची एकी महत्वाची आहे ,असे फारशी राजकीय चिरफाड न करणारे विधान त्यांनी केले होते .