जळगाव नवीन बसस्थानकातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : चालक रिव्हर्स घेत संबंधित ठिकाणी बस लावत असताना प्रवाशाला पाठीमागून एस.टी. बसचा धक्का लागल्याने प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार दिनांक १४ रोजी दुपारी येथील नवीन बसस्थानकात घडली.
अरुण रघुनाथ पारधी (वय ४६, रा. धानोरा) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मोठा मुलगा सचिन (वय २१) लहान मुलगा (१८) आहेत. अरुण पारधी हे खोबरे, खारीक तसेच मधाची विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सकाळी मध घेऊन ते जळगाव शहरात मधाची विक्री करत होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास धानोरा येथे घरी जाण्यासाठी ते बसस्थानकावर बसच्या प्रतीक्षेत उभे होते.
दरम्यान बाहेरून आगारात एस.टी. बस आली. ती संबंधित प्लॅटफॉर्मवर लावण्यासाठी चालक बस मागे घेत होते. स्थानकाकडे तोंड करून उभे असलेले अरुण पारधी यांना पाठीमागून बसचा अचानक धक्का लागल्याने ते कोसळले. हा प्रकार पाहिल्यानंतर मयूर पाटील तसेच त्याचा महाविद्यालयीन तरुण अशा दोघांनी वाहनात टाकून अत्यवस्थ अरुण पारधी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती पारधी यांना मृत घोषित केले. मृत्यू झाल्याचे कळाल्याने कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला दरम्यान घटनेची जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते.