बुलढाणा ;– सौदी अरेबिया येथून परतल्यानंतर कोरोना व्हायरसची लक्षणे आढळून आलेल्या एका 71 वर्षीय संशयीत रुग्णाचा बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी दुपारच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयातील शल्य चिकित्सक प्रेमचंद पंडीत यांनी ही माहिती दिली आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात भरती होण्याचा सल्ला दिला असून रुग्णालयाची टीम त्यांच्या संपर्कात असल्याची माहितीही पंडीत यांनी दिली. महाराष्ट्रातील कोरोना संशयीताचा मृत्यू झाल्याची ही पहिली घटना आहे.
या रुग्णाचा तपासणी अहवाल अद्याप आला नसल्याने सध्यातरी तो कोरोना संशयीतच असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक प्रेमचंद पंडीत यांनी सांगितले. मृत वृद्ध हे चिखली तालुक्यातील असून ते शुक्रवारी सौदी अरेबिया येथून परत आले होते. ताप आणि सर्दीची लक्षणे आढळल्यामुळे त्यांना आधी एका खासगी रुग्णालयात ठेवण्यात आले होते. परंतु, कोरोनासदृश लक्षणे आढळल्यामुळे त्यांना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात खबरदारीच्या दृष्टीकोणातून ठेवण्यात आले होते. सदर वृद्ध व्यक्तीस आधीपासूनच मधुमेह व इतर आजार असल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर होती. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असताना, सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या रुग्णाचे नमुने हे नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून 15 मार्च रोजी सायंकाळी किंवा 16 मार्च रोजी दुपारपर्यंत त्याचा अहवाल जिल्हा सामान्य रुग्णालयास प्राप्त होणार आहे.