वॉशिंग्टन: अमेरिकेत करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाच्या संसर्गामुळे अमेरिकेत सोमवारी १० हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला. तर, करोनाबाधितांची संख्या जवळपास साडे तीन लाखांपर्यंत पोहचली आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे अमेरिकेसमोर आता आणखी आव्हाने उभी राहिली आहेत.
जानेवारी महिन्याच्या अखेरीस अमेरिकेत करोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर आतापर्यंत अमेरिकेत तीन लाख ५० हजारांहून अधिक जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, १० हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेताील सर्वच ५० राज्यांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. सर्वाधिक रुग्ण न्यूयॉर्क राज्यात आढळले आहे. न्यूयॉर्कमध्ये तब्बल एक लाख ३१ हजार रुग्ण आढळले आहेत. तर, तब्बल ४ हजार ७०० जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमधील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला असल्याचे चित्र असून लष्करही प्रशासनाच्या मदतीसाठी उतरले आहे. सार्वजनिक उद्याने, मैदानांमध्ये तंबू उभारून तात्पुरती रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत.