मुंबई : महिलांवरील अत्याचारांना चाप लावण्यासाठी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर ‘दिशा’ कायदा आणण्यासाठी विधिमंडळाच दोन दिवसांच विशेष अधिवेशन बोलवण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी विधान परिषदेत एका निवेदनाद्वारे केली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हे अधिवेशन बोलवण्यात येईल असंही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
महिला अत्याचारांना चाप लावण्याच्या दृष्टीनं, महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणासंदर्भातला हा कायदा याच अधिवेशनात आणण्याचं सरकारचं नियोजन होतं, मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुदतीपूर्वीच संस्थगित करावं लागत असल्यामुळे या कायद्याचं विधेयक या अधिवेशनात मांडणं शक्य नाही असं अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं. हा कायदा करताना , विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विचार मंथन होणं गरजेचं आहे. त्यामुळे यासाठी अध्यादेश नं आणता दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं.