जळगाव ;- शहरातील गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरील जिल्हा मृदा व जलसंधारण अधिकार्यांच्या कार्यालयासमोरील एका रिकाम्या हॉलमधील कचर्याने अचानक पेट घेतल्याने सगळेच धास्तावले होते. सायंकाळी सव्वा पाच वाजता आग लागल्याचे लक्षात येताच काही दुकानदार व पाचव्या मजल्यावरील काही रहिवाशांनी धाव घेऊन मिळेल तसे पाणी आणून ही आग विझविली. हा हॉल वापरात नसल्याने तेथील विद्यूत यंत्रणा निष्क्रीय असल्याने मोठा अनर्थ टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
गोलाणी माकेॅटमधील अशी अनेक रिकामी दुकाने व हॉल जवळच्या व आसपासच्या मजल्यांरील रहिवाशी आणि दुकानदारांकडून कचरा फेकण्यासाठी वापरले जात असल्याची बाब यानिमित्ताने पुढे आली आहे. महापालिकेचा मालमत्ता आणि आरोग्य विभाग जणू या गोष्टींची काळजी घेण्याचे आमचे कामच नाही ृअशा थाटात राहात असल्याने तिसर्या, चौथ्या मजल्यावरील रहिवाशांसह व्यापारी संतप्त झाले आहेत. या मजल्याची सफाई करणारे कामगारच अशा जागा दिसेल तेथष कचरा फेकून देत असल्याचा आरोपही या व्यापार्यांनी केला. आम्ही यापुर्वी तीन वेळा महापालिका व जिल्हाधिकार्यांनाही या अनागोंदीबद्दल लेखी तक्रारी देऊनही काहीच उपयाग झाला नसल्याचे जिल्हा मृदा व जलसंधारण अधिकार्यांच्या कार्यालयातील कर्मचार्यानी सांगितले. मार्च एण्डच्या कामांमुळे आज रविवार असूनही ते कर्मचारी कार्यालयात आलेले होते. अन्य लोकांनी टाकलेल्या कचर्यामुळे या भागात स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर झालेला आहे. तळीरामांनी टाकलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खचही ही आग विझविताना लोकांना तेथून बाहेर काढावा लागला!