अमळनेर – अमळनेर तालुक्यातील 12 हजार 253 शेतकऱ्यांपैकी जिल्हा बँकेचे 10 हजार 954 व राष्ट्रीयीकृत बँकेचे 1732 जणांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून उर्वरित शेतकऱ्यांच्या बाबतीत त्रुटी तपासण्याचे काम सुरू आहे. अशी माहिती बँकेच्या अधिकारी व सचिव यांच्या बैठकीत दिली.
आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी रविवारी बँक अधिकारी व सचिव यांची संयुक्त बैठक घेऊन त्यांच्याकडून माहिती जाणून घेत त्यांना काही सूचना दिल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी शनिवार 29
फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी कर्जमाफीच्या पोर्टलवर शनिवारी
प्रसिद्ध झाल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणाऱ्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती 2019 योजनेची दुसरी यादी शुक्रवारी जाहीर होणार आहे, अशी घोषणा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली होती त्यानुसार दुसऱ्या यादीमध्ये तालुक्यातील एकूण 14 हजार 736 शेतकऱ्यांपैकी 12 हजार 253 लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे त्यासाठी त्यांच्या खात्यावर विनाविलंब पैसे पडावेत यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती.
यादीतील नावाशी आधार लिंकिंग करा –
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेची गाव निहाय यादी कर्जमुक्ती वेबसाईटवर उपलब्ध असून यादी मधील क्रमांक , आधार क्रमांक आणि कर्ज मुक्त रक्कम बरोबर असल्यास कर्जमुक्त लवकर होण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या सरकार सेवा केंद्रावर किंवा स्वस्त धान्य दुकानात जाऊन आधार पंजीकरण करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार मिलिंद वाघ यांनी केले आहे.
———-