लाखांनी मते घेऊन जिंकली मने, तालुकावासियांची खोडपेंना मोठी साथ
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- जामनेर विधानसभा मतदारसंघामध्ये नेहमीप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश दत्तात्रय महाजन हे विजयी झाले. मात्र पराभूत उमेदवार दिलीप बळीराम खोडपे यांनी १ लाख १ हजार मते घेऊन मतदारांचे मन जिंकून घेण्याचे काम केले आहे.
मागील निवडणुका पाहता गिरीश महाजन यांच्या विरोधी उमेदवाराला लाखांपर्यंत मते जवळपास गाठता आलेले नाही. मात्र दिलीप बळीराम खोडपे यांनी जामनेर तालुक्यामध्ये स्वतःच्या प्रतिमेची स्वतंत्र छाप मतदारांवर सोडली. महाविकास आघाडीतर्फे येथे पूर्ण जोर लावण्यात आला. पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या सभेपासून एकनाथराव खडसेंची सभा येथे लागली. त्यामुळे दिलीप खोडपे आणि कार्यकर्ते उत्साही होऊन त्यांनी जनसंपर्क चांगला केला. तर मतदारापर्यंत पोहोचले.
मात्र राज्यातील वजनदार नेतृत्वाचा ठसा असणारे गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्यांनी ते मतदारसंघात प्रचाराला फारसे नसतानाही नियोजनबद्ध निवडणुकीला सामोरे गेल्यामुळे २६हजार ८८५ मताधिक्याने गिरीश महाजन यांचा विजय झाला आहे. सातव्यांदा आमदार झाल्यामुळे त्यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे यांना मित्र पक्षाकडून फारशी मदत मिळाली असे दिसून आले नाही. प्रचार तंत्राचा प्रभावी वापर कसा करावा यामध्ये दिलीप खोडपे कमी पडले. ग्रामीण भागातील मतदारांनी खोडपे यांना मोठ्या प्रमाणात साथ दिली.
चांगला उमेदवार लाभल्यामुळे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी अधिक जोर लावून मतदारापर्यंत पोहोचत आवाहन केले होते. मात्र भारतीय जनता पक्षाचे दरवर्षीचे नियोजन हे खोडपे सरांच्या नियोजनावर प्रभावी ठरले. त्यामुळेच खोडपे पराभूत झाले. मात्र तरीही भाजपच्या वजनदार नेत्याविरुद्ध अर्थात संकटमोचकाविरुद्ध १ लाख १ हजार ७८२ मते घेणे ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे दिलीप खोडपे यांच्यात नक्कीच आत्मविश्वास आलेला असेल यात शंका नाही.