रक्षा खडसेंच्या विरोधात खडसे परिवारातून कोणीच नाही : पत्रपरिषदेत स्पष्टीकरण
जळगाव (प्रतिनिधी) : वैयक्तिक फायद्यासाठी आ. एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा बळी द्यायचा प्रयत्न केला आहे. घराण्यातच त्यांनी भाजपाकडून रक्षा खडसेंसाठी तिकीट मिळवून घेतले, असा आरोप मुक्ताईनगर विधानसभेचे आ. चंद्रकांत पाटील यांनी केला. तर दुसरीकडे आ. खडसेंनी स्वतः किंवा रोहिणी खडसे या लोकसभा निवडणूक लढविणार नाही असे शुक्रवारी दि. १५ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. यामुळे एकप्रकारे आ. चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्याला बळ मिळाले असून खडसे परिवारातून रक्षा खडसेंविरोधात कोणीही उभे राहणार नाही असे हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आ. खडसे हे स्वतः च्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी किती प्रयत्न करतात हे आता पाहण्यासारखे आहे.
शुक्रवारी १५ मार्च रोजी चंद्रकांत पाटील यांच्याकडुन पत्रकारांनी माहिती जाणून घेतली. भाजपाने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनाच तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. यावर आ. पाटील म्हणाले की, खा. खडसे साहेब जसा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा जसा प्रचार करतील तसाच मी पण महायुतीच्या उमेदवारीचा प्रचार करणार आहे. मात्र वैयक्तिक फायद्यासाठी खडसेंकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचा बळी देण्याचे काम सुरु आहे. मी अपक्ष आमदार असून महायुतीला पाठिंबा दिला असला तरी वेळेवर निर्णय घेणार असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
यानंतर दुपारी आ. एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, उद्या लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची घोषणा होणार आहे. मी खासदारकी लढणार नाही. माझी प्रकृती ठीक नसल्याने मला डाॅक्टरने उमेदवारीसाठी नाही सांगितले आहे. तसेच रोहीणी खडसे यादेखील लोकसभा लढविणार नाही. रोहीणी खडसे हे विधान सभेच्या उमेदवारीसाठी लढतील, अशी माहिती एकनाथराव खडसे यांनी पत्रपरिषदेत दिली. त्यामुळे आता रक्षा खडसे यांच्याविरोधात खडसे परिवारातून कोणीही उभे राहणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे.
००००००००००००००