जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील प्रकार
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथे गोमांस विकत असल्याच्या संशयावरून एका इसमास आठवडे बाजार येथे जमावाकडून जबर मारहाण करण्यात आली. वेळीच एमआयडीसी पोलीसांनी हस्तक्षेप करीत सदर इसमास ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
शिरसोली प्र. न. येथील एका ठिकाणी गोमांस विक्री होत असल्याचे गावातील काही तरुणांना कळले. त्यावरुन काही तरुणांनी गोमांस विक्री करीत असलेल्या इसमास त्या ठिकाणाहून मुद्देमालासह पकडुन शिरसोली प्र बो येथील बाजारपेठ भागात आणले. गोमांस विक्री करणाऱ्याला पकडले असल्याची वार्ता गांवात पसरताच बाजारपेठेत एकच गर्दी जमा झाली. या गर्दीपैकी काही तरुणांनी या इसमास चांगलाच चोप दिला. या वेळी काहींनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करुन पोलीसांना माहिती दिली.
वेळीच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ए. पी. आय अनिल वाघ, पीएसआय राहुल तायडे, हेड कॉन्स्टेबल समाधान टहाकळे, शुद्धोधन ढवळे, अधिकार पाटील, योगेश बारी, किरण पाटील यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करत संशयीत इसमाची गर्दीतून सुटका करीत चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलीस स्टेशनला रवाना करण्यात आले. या वेळी नंतर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.