जळगाव शहरातील मोहाडी रोड येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील मोहाडी रोड व लांडोरखोरी उद्यानाजवळ आज (२४ जानेवारी) सकाळी एक धक्कादायक घटना घडली. प्रवासादरम्यान एका चारचाकी गाडीला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
जळगाव शहरातील आदर्श नगर परिसरात गुरूमीत सिंग हे कुटुंबियांसह राहतात. नेहमीप्रमाणे गुरूमीत सिंग हे कार क्रमांक (एमएच १९ बीयू ३००१) ने महाबळ परिसरात लांडोरखोरी येथे आलेले होते. त्यावेळी त्यांनी मोहाडी रस्त्यावर कार उभी केली होती. दरम्यान कारमध्ये शार्टसर्कीट झाल्याने सुरूवातीला धुर निघाला आणि त्यानंतर क्षणात कारने पेट घेतला. स्थानिक नागरिकांनी परिस्थिती पाहताच तातडीने मनपाच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवत मोठा अनर्थ टाळला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनीही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र आगीच्या तीव्रतेमुळे त्यांना यश आले नाही. मात्र, अग्निशमन दलाच्या वेगवान आणि प्रभावी कारवाईमुळे आग आणखी पसरली नाही. आगीची प्राथमिक चौकशी करण्यात आली असून ती शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समोर आले आहे.