जळगावातील एमआयडीसी भागात आरएल चौफुलीवरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील आरएल चौफुली येथे भरधाव डंपरने पुढे जाणाऱ्या दुचाकीला उडवल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दिनांक ११ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
आसिफ हाजी शौकत कुरेशी (वय ४० रा. आशा नगर, सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले आणि १ मुलगा असा परिवार आहे. उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेले आसिफ कुरेशी पत्नी व चार मुलांसह जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील आशानगर येथे वास्तव्याला होते. वॉल फिटिंगचे काम करून ते उदरनिर्वाह करत होते. बुधवारी ११ डिसेंबर रोजी दुपारी ते गावात दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीसी १७५१) ने गेलेले होते. जळगाव शहरातील काम आटपून ते दुपारी 3.30 वाजता घरी जाण्यासाठी निघाले होते.
त्यावेळी एमआयडीसीतील आर. एल. चौफुली येथून जात असताना त्याच्या मागून येणारे डम्पर क्रमांक (एमएच १९ सीएक्स ४९४०) ने मागून जोरदार धडक दिली. आसिफ कुरेशी यांचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रवाना करण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.