समाजातील विविध घटकांमध्ये करणार प्रबोधन
जळगाव (प्रतिनिधी) :- एचआयव्ही, एड्सबाबत जनजागृती करण्यासाठी दि. १ ते १५ डिसेंबरदरम्यान तसेच त्याचप्रमाणे त्यापुढील कालावधीतही जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये प्रभात फेरी, महाविद्यालयामध्ये व्याख्यान, विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम, रेल्वे, बस स्थानक, गर्दीच्या ठिकाणी तपासणी शिबिराचे आयोजन त्याचप्रमाणे अति जोखमीचे गटातील व्यक्तीकरीता समुपदेशन व तपासणी शिबिरे तसेच समाजातील दुर्लक्षित गट जसे बांधकाम कामगार, घरेलू कामगार, विविध वाहनांचे चालक क्लिनर यांचे करिता एच आय व्ही एड्स जनजागृती, समुपदेशन, तपासणी, संदर्भ सेवा इत्यादी करिता वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच जिल्ह्यातील रेड रिबन क्लब स्थापन केलेल्या ४८ महाविद्यालयामधील रेड रिबन क्लबद्वारे मानवी साखळीद्वारे संदेश देणे, पोस्टर्स स्पर्धा, सोशल मीडिया पोस्ट स्पर्धा, पथनाट्य, फ्लॅश मॉब ऍक्टिव्हिटी आयोजित करण्यात येणार आहे. तरी सदर उपक्रमात जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय कार्यालयातील कर्मचारी, विविध संस्था अंतर्गत लाभार्थी व सर्वसामान्य जनता यांनी सहभागी व्हावे तसेच शासनामार्फत देण्यात आलेल्या मोफत सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जळगाव यांचे मार्फत करण्यात आलेले आहे.