जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरातील घटनेने जिल्हा हादरला
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील हरी विठ्ठल नगरमध्ये राहणाऱ्या एका विवाहितेने राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी दि. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सोनाली दिपक दाभाडे (वय ३६) आणि तेजस्विनी दीपक दाभाडे (वय ८) असे मयत आई व मुलीचे नाव आहे. त्यांचे पती दीपक दाभाडे हे फॅब्रिकेशनचा व्यवसाय करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात.(केसीएन)दरम्यान, हरिविठ्ठल नगर भागात तीन मजली इमारतीत ते इतर दोन भावांसह वास्तव्याला आहेत. दीपक दाभाडे हे आज दि. २४ रोजी भावांसह नातेवाईक वारल्यामुळे भुसावळ येथे गेलेले होते.
त्यांची पत्नी सोनाली दाभाडे व त्यांची मुलगी तेजस्विनी हे घरी एकटे होते. त्यांनी सकाळी ९ वाजेनंतर कधीतरी मुलीला एका स्कार्फने गळफास देऊन स्वतः सोनाली दाभाडे यांनी दुसऱ्या स्कार्फने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.(केसीएन) दुपारी १२ वाजेच्या सुमारास पती दीपक दाभाडे व परिवार भुसावळ येथून घरी आले तेव्हा घटना उघड झाली. तिसऱ्या मजल्यावर पती गेले असता आतून दरवाजा लावून घेतलेला होता. तेव्हा दरवाजाला धक्का मारून आत गेल्यावर दोघांचे मृतदेह पाहताच पती दीपक यांचे अवसान गळून त्यांनी एकच हंबरडा फोडला.
नातेवाईकांनी तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोघांना दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.(केसीएन) यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान, आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे जळगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.