जळगाव (प्रतिनिधी) :- बुधवार दि. 20 नोव्हेंबर रोजी जळगाव, धुळे आणि नंदुरबार या खान्देशी जिल्ह्यांसह संपूर्ण राज्यभरात विधानसभेसाठी मतदान आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिमंडलात विशेषतः मतदान केंद्रावर अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठ्याच्या सुचना जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी महावितरण यंत्रणेस दिल्या.
परिमंडलातील वीजविषयक विविध कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची व्हिडीओ कॉन्फ़्रन्सींगव्दारे नुकतीच आढावा बैठक झाली. बैठकीस परिमंडलातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांचे अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते यांच्यासह वित्त व लेखा विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.बैठकीत वीजबिल वसुलीबाबत प्रभावी काम करण्याचे आवाहन करतानाच चालू वीज बिलांसह थकबाकी वसुलीवरही लक्ष केंद्रीत करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.
‘महावितरण अभय योजना-२०२४’ ही योजना कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असणाऱ्या ग्राहकांसाठी एक जीवनदायी योजना असून त्याचा जास्तीत जास्त खंडित ग्राहकांना फ़ायदा मिळवून देण्यासाठी सर्वसामावेश प्रयत्न करण्याच्या सुचनाही क्षेत्रीय अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या. दि. २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान आहे. त्यामुळे सर्व मतदान केंद्रावर वीज वाहिन्या आणि उपकेंद्रांच्या माध्यामातून योग्य त्या देखभाल व दुरुस्तीसह सुरळीत आणि अखंडित वीजपुरवठा ठेवून निवडणूक यंत्रणेस सहकार्य करण्याच्या सुचना शाखा अभियंता आणि महावितरणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.