धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चाळीसगावात कारवाई
चाळीसगाव (प्रतिनिधी) : दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि त्रास होऊ नये यासाठी तक्रारदाराला लाच मागितल्याप्रकरणी येथील चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हवलदार व पंटरला २ हजार रुपयांची लाच घेताना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
तक्रारदार हे मौजे तरवाडे ता.चाळीसगांव येथील रहिवासी असुन त्यांचे गावातील इसमाशी वादविवाद झाल्याने व त्या इसमाने तक्रार दिल्याने तक्रारदार यांचेविरुध्द चाळीसगांव ग्रामीण पो.स्टे. येथे दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर वाघळी बिटचे पोलीस हवलदार जयेश रामराव पवार यांनी तक्रारदार यांना पोलीस स्टेशन येथे दिनांक ८ नोव्हेंबर रोजी बोलावुन त्यांचेवर तहसिलदार, चाळीसगांव यांचेसमक्ष प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना पोलीस स्टेशन येथे बसवुन ठेवले होते.
तेव्हा तक्रारदार यांनी त्यांना घरी जावु देणेबाबत विनंती केली असता, त्यांनी तक्रारदार यांचेविरुध्द दाखल झालेल्या गुन्हयात व प्रतिबंधक कारवाईमध्ये मदत करण्याच्या मोबदल्यात तसेच त्यामध्ये तक्रारदार यांना त्रास न होवु देण्यासाठी त्यांच्याकडे ४ हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी दि. १२ नोव्हेंबर २०२४ मंगळवार रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयात समक्ष येवुन तक्रार दिली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने दि. १२ नोव्हेंबर रोजी चाळीसगांव येथे जावुन पडताळणी केली असता पोलीस हवालदार जयेश पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष तडजोडीअंती ४ हजार रुपये लाचेची मागणी केली.
त्यांचेवर सापळा लावला असता सापळा कारवाई दरम्यान सदर लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता २ हजार रुपये त्यांनी खाजगी इसम सुनिल श्रावण पवार (रा.न्हावे, ता.चाळीसगांव) यांचे हस्ते त्यांचे वाघळी येथील बिट कार्यालयात स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांचेविरुध्द चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून जयेश पवार व सुनिल पवार यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली.