मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थिती देण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : एरंडोल-पारोळा भडगाव विधानसभा मतदारसंघात अनेक प्रतिस्पर्धी असताना सुद्धा विजय हा विकासाचाच होणार असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांनी केले. उद्या दि.१२ मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य सभा होणार असून नागरिकांनी, लाडक्या बहिणींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन अमोल पाटील यांनी केले.
दि.१२ नोव्हेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा दु. ४ वाजता एन.ई.एस हायस्कूल पारोळा येथे होणार असल्याने राज्य सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा व पुढील कामासाठी केलेला वचननामा सुद्धा जाहीर करतील. महायुती सरकारचा वचननामा माझ्या विजयाला नक्कीच चालना देईल अशी आशा सुद्धा त्यांनी व्यक्त केली.
मतदारसंघात ज्या-ज्या ठिकाणी प्रचारानिमित्त भेट दिली, त्या-त्या ठिकाणी अनेक महिलांच्या चेहऱ्यावरचे दिसून आलेले भाव माझ्या विजयाला नक्कीच तारक ठरतील. प्रचारात तरुणांचा सहभाग मोठा असून प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. महायुतीच्या खा. स्मिताताई वाघ यांच्या विजयासाठी जेवढ्या जोमाने आम्ही युतीचे कार्यकर्ते म्हणून काम केले, तेवढ्याच जोमाने आम्हाला महायुतीच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभत असल्याने अमोल पाटील यांनी समाधान व्यक्त केले.