जळगांव जिल्हयात वाढलेल्या मो.सा. चोरीच्या गुन्हयांवर आळा बसावा याकरिता पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांनी रात्रगस्ती सतर्क करणेबाबत वेळोवेळी सूचना दिल्या आहे. पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांचे मार्गदर्शनाखाली जळगांव शहर पो.स्टे.चे गुन्हे शोध पथक शनिवारी रात्री गस्तीवर होते.
गेंदालाल मिल परिसरात रात्रगस्ती दरम्यान संशय आल्याने ३ दुचाकिधारकांना थांबवुन चौकशी करून मोटारसायकलचे कागदपत्रांचे मागणी केली असता तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. संशयित हे पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना पथकाने त्यांना ताब्यात घेवुन जळगांव शहर पोलीस ठाण्यात आणले. तिघांची माहीती घेतली असता सदर दुचाकी यांना लावलेल्या नंबर प्लेट या फेक असल्याचे व त्या दुचाकी चोरीच्या असल्याचे समजले.
पोलिसांनी तिघांची नावे विचारली असता त्यांनी जाफर जाबाज पठाण (वय-२८ रा.रवांजा बु. एरंडोल), पितांबर रतन सोनवणे (वय-२३), प्रवीण भाईदास कोळी (वय-२३ रा.नवगाव विखरण) असे सांगितले. धरणगांव पोलीस स्टेशनला हे गुन्हे उघड झाले आहेत. महामार्गालगत उभ्या असलेल्या दुचाकी चोरून ते जळगावात विक्रीसाठी आणत होते. पथकातील सहाय्यक निरीक्षक रामचंद्र शिखरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिल पाटील, हवालदार उमेश भांडारकर, संतोष खवले, सतिश पाटील, भास्कर ठाकरे, योगेश पाटील, किशोर निकुंभ, अमोल ठाकुर, राहुल पांचाळ आदींनी कारवाई केली.