अमळनेर तालुक्यात देवगाव-देवळी गावाजवळ घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- भरधाव बसने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार त्यात जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील देवगाव–देवळी गावाच्या खडकी नाल्याजवळ दि. ३० रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भानुदास पुंडलिक पाटील (वय -६४, रा.खाचणे ता.चोपडा) असे मयत प्रौढाचे नाव आहे. भानुदास पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले व नातवंडं असा परिवार आहे. (केसीएन)भानुदास हे खाचणे येथून खाजगी कामानिमित्त दुचाकीने (एमएच १९ एजे ४३९७) अमळनेरकडे जात होते. तालुक्यातील देवगाव देवळी फाट्याजवळ चोपडाहुन बदलापूरकडे जाणाऱ्या एस.टी.बस क्रमांक (एम एच २० बी एल २५३८) या बस वरील चालकाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
यात भानुदास पाटील हे रस्त्यावर दूरवर फेकले गेले. यात त्यांच्या डोक्याला, चेहऱ्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मयत भानुदास पाटील यांच्या चुलत भावाच्या फिर्यादीवरून बस चालक शेख मिनाजोद्दिन जहीरोद्दीन (रा.अडावद ता.चोपडा) याच्याविरोधात अमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनील पाटील करत आहे. ते विनोद व नरेंद्र यांचे वडील होत.