नवी दिल्ली : जगावर ओढावलेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसचे सकंट लक्षात त्यावर प्रतिबंधक लस बनवण्याचे काम जगभरातील अनेक देशांमध्ये सुरु आहे. त्यातच हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्या जगभरातील अनेक देश कोरोनाबाधित रुग्णांना देत आहे. या औषधांच्या वापरावर जगभरातील अनेक देशांनी बंदी घातली असतानाच आता याचा वापर करण्यावर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)देखील बंदी घातली आहे. मलेरियाचे औषध कोरोनाच्या उपचारासाठी वापरु नये, असे आरोग्य संघटनेने सांगितले आहे.

काल जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची क्लिनिकल चाचणी खबरदारीचा उपाय म्हणून तात्पुरती बंद केली आहे. एका रिपोर्टच्या आधारे हा निर्णय घेतल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्यांमुळे कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो, असा दावा या रिपोर्टमध्ये केला जात आहे. या रिपोर्टच्या आधारावर या गोळ्यांचा वापर बंद केल्याचे आरोग्य संघटनेने सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी मलेरिया आणि अन्य आजारांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन किंवा क्लोरोक्विनचा कोरोनाच्या उपचारासाठी वापर करण्याबाबत आरोग्य संघटनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इशारा दिला होता. क्लिनिकल ट्रायलमध्ये या गोळ्यांना वापरण्यासाठी राखीव ठेवण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
भारतात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. या गोळ्यांचा वापर मलेरियासारख्या आजारावंर उपचारासाठी होतो. या औषधाचा वापर मलेरियाव्यतिरिक्त आर्थरायटिसमध्येही केला जातो. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी अमेरिकेत या गोळ्या दिल्या जात आहेत. याचे सकारात्मक परिणामही दिसत असल्यामुळे इतर देशातही या गोळ्यांची मागणी अचानक वाढली आहे. या गोळ्यांचा खास परिणाम सार्स-सीओव्ही-2 वर होतो. हा तोच व्हायरस आहे, ज्यामुळे कोविड-2 ची लागण होते. त्यामुळेच हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांना दिल्या जात आहेत.







